ध्वनिप्रदूषण टाळत गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश; पोलिसांचा चोख बंदोबस्त
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार वणी उपविभाग पोलिसांकडून यंदाचा गणेशोत्सव डीजे आणि ध्वनिप्रदूषणमुक्त वातावरणात, शांततेत व आनंदात साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. “भक्तीचा उत्सव शांततेत आणि आनंदात साजरा करूया, परंपरा जपूया, संस्कृती टिकवूया” असा संदेश देण्यात आला.
मोठ्या आवाजामुळे कानांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना त्रास होऊ शकतो. ध्वनिप्रदूषणामुळे तणाव, अस्वस्थता आणि झोपेच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. मोठ्या आवाजाचा परिणाम पर्यावरणासह प्राणी-पक्ष्यांवरही होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर वणीतील सार्वजनिक गणेश मंडळांनी डीजेचा वापर टाळत ढोल, ताशा, झांज, टाळ, भजन आदी पारंपरिक वाद्यांच्या साथीने गणरायाला निरोप दिला. त्यामुळे भक्ती, परंपरा आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर वणी उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे आणि ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
विसर्जन घाटावर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे, नगराध्यक्षा सौ. विद्याताई आत्राम, नगरसेवक-नगरसेविका तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
डीजेच्या दणदणाटाऐवजी पारंपरिक वाद्यांचा निनाद करत गणेशभक्तांनी दिलेला हा निरोप ध्वनिप्रदूषणमुक्त आणि संस्कृती जपणाऱ्या उत्सवाचा संदेश देणारा ठरला.

