गेट बंद असताना वाहनांची गर्दी; ट्रॅफिक कंट्रोल आणि सुरू असलेल्या ब्रिजच्या कामामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवरही प्रश्नचिन्ह
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : चिखलगाव रेल्वे क्रॉसिंगवर रविवारी (२७ सप्टेंबर) सायंकाळी ७ ते ८ वाजताच्या सुमारास घडलेल्या थरारक अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. रेल्वे गेट बंद असल्याने रेल्वे जाण्याची प्रतीक्षा करत रस्त्यावर थांबलेल्या वाहनांमध्ये अचानक ट्रक घुसल्याने तब्बल ६ ते ७ मोटारसायकली ट्रकखाली चिरडल्या गेल्या. सुदैवाने नागरिकांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाजूला होण्याचा प्रयत्न केल्याने मोठी जीवितहानी टळली.
रेल्वे क्रॉसिंगचे गेट बंद असल्याने दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनांची रस्त्यावर मोठी रांग लागली होती. या वाहनांच्या मागे एक ट्रक उभा होता. दरम्यान, अचानक ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येत असून ट्रक पुढे सरकत थेट रस्त्यावर थांबलेल्या दुचाकींवर आदळला. काही क्षणांतच एकापाठोपाठ एक दुचाकी ट्रकखाली गेल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
या धडकेत अनेक दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ट्रक अचानक पुढे आल्याचे लक्षात येताच काही नागरिकांनी प्रसंगावधान राखून बाजूला होण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळल्याचे चित्र आहे.
वाहतूक नियोजनाचा अभाव पुन्हा चर्चेत
चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग परिसरात सध्या ट्रॅफिक कंट्रोलचा प्रश्न आणि ब्रिजचे सुरू असलेले काम यामुळे वाहतुकीवर अतिरिक्त ताण पडत असल्याचे दिसून येत आहे. रेल्वे गेट बंद झाल्यानंतर वाहनांची मोठी रांग लागते. अशा वेळी अवजड वाहनांसाठी योग्य अंतर, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षित मार्गदर्शनाची व्यवस्था असणे गरजेचे आहे.
ब्रिजचे काम सुरू असताना वाहतुकीचे नियोजन अधिक काटेकोरपणे करण्याची आवश्यकता आहे. वाहनांची कोंडी कुठे होते, अवजड वाहने कुठे थांबतात आणि रेल्वे गेट बंद असताना मागून येणाऱ्या वाहनांना कसे नियंत्रित केले जाते, याबाबत संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच संभाव्य धोके ओळखून प्रतिबंधात्मक व्यवस्था करणे अपेक्षित आहे.
या अपघातानंतर ट्रॅफिक कंट्रोल, ब्रिजच्या कामादरम्यानचे वाहतूक नियोजन आणि रेल्वे क्रॉसिंगवरील सुरक्षाव्यवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला, ट्रक चालकाचे नियंत्रण का सुटले आणि यामध्ये कोणाची जबाबदारी आहे, हे संबंधित यंत्रणेच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेने चिखलगाव रेल्वे क्रॉसिंगवरील वाहतूक सुरक्षेबाबत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली आहे.
