ठळक बातम्या

    तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गाजविले खो खो चे मैदान

     १४वर्षाखालील मुलांचा आणि सतरा वर्षाखालील मुलींचा संघ विजयी, शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

     वणी : क्रीडा क्षेत्रात आपल्या कौशल्याचा, जिद्दीचा आणि सांघिक एकजुटीचा दमदार ठसा उमटवत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.१४ वर्षाखालील मुलांच्या खो-खो संघाने तसेच १७ वर्षाखालील मुलींच्या खो-खो संघाने विजय मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एका मानाच्या पानाची भर पडली आहे.

    तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत विविध शाळांमधील संघानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट चपळाई,अचूक नियोजन, वेगवान हालचाली आणि प्रभावी सांघिक समन्वयाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांना कडवी झुंज दिली. मैदानावरील प्रत्येक क्षणी विजयासाठी प्रयत्नशील राहत विद्यार्थ्यांनी आपल्या खेळातून जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडविले.चौदा  वर्षाखालील खेळाडू जॉय मरसकोल्हे,यश थाटे, नोक्ष थाटे,तन्मय दुरटकर, अनुभव पथाडे, अनय  मंडाले,शाहिद खान,निशांत मडावी, निकुंज आवारी,उत्कर्ष बोधे या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाच्या जोरावर विजय मिळवला तर सतरा वर्षाखालील मुलीच्या संघात गुंजन थेरे, इकरा खान, वैष्णवी सोनवणे  तनवी जेंगठे, शैलू मिश्रा, सादिया खान,साजिया अन्सारी,तृप्ती निमकर, शरण्या खाडे,निदा चिनी या संघाने ही दमदार दमदार कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. दोन्ही संघाच्या या यशामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयामागे विद्यार्थ्यांची नियमित मेहनत,खेळाप्रती असलेली निष्ठा,प्रशिक्षक अदनान सय्यद यांचे मार्गदर्शन आणि शाळेने दिलेले प्रोत्साहन यांचा मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळणार आहे. वणी पब्लिक स्कूलचे संस्थाध्यक्ष श्री माननीय ओमप्रकाश जी चचडा, मुख्याध्यापक श्री सतीश बाविस्कर आणि शिक्षक वृंद यांनी विजयी खेळाडूंचे आणि क्रीडा शिक्षक अदनान सय्यद यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

    जिद्द,मेहनत आणि सांघिक एकजूट यांच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते हे वणी पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी आपल्या शानदार कामगिरीतून सिद्ध करून दाखविले. या दुहेरी विजयामुळे शाळेचा नावलौकिक वाढला असून विजयी खेळाडूंचे आणि क्रीडाशिक्षक अदनान सय्यद यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

    Photo