विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
खडकी / गणेशपूर : दि. ९ ऑक्टोबर २०२६खडकी–गणेशपूर परिसरातील ईशान कॅल्सी व डिलाइट केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या औद्योगिक कंपन्यांमुळे प्रदूषण, धूर, धूळ, शेतीचे नुकसान, पाण्याचा वापर आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक व शेतकरी बांधवांनी केली आहे.
आज दि. ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या जनसुनावणीदरम्यान नागरिकांनी आपली भूमिका प्रशासनासमोर आक्रमकपणे मांडली. यावेळी अपर जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमोर नागरिकांनी लेखी तक्रार सादर केली.
शेती, आरोग्य आणि पाण्याचा प्रश्न ऐरणीवर
स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या म्हणण्यानुसार, औद्योगिक प्रदूषणाचा शेती, पिके, जमीन आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची चिंता आहे. त्यामुळे प्रदूषणाचे शास्त्रीय पद्धतीने परीक्षण करून त्याचा शेती व पर्यावरणावर नेमका परिणाम होत आहे का, याची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच यवतमाळ जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर असताना औद्योगिक प्रकल्पांमध्ये होणाऱ्या पाण्याच्या वापराबाबतही प्रशासनाने योग्य ती चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
प्रदूषणामुळे शेती किंवा पिकांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाल्यास नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात यावी.
खडकी–गणेशपूर परिसरातील स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.
कंपन्यांचा CSR निधी स्थानिक गावांच्या विकासासाठी वापरण्यात यावा.
ईशान कॅल्सी व डिलाइट केमिकल या दोन्ही कंपन्यांची सखोल प्रत्यक्ष तपासणी करण्यात यावी.
धूर, धूळ, उत्सर्जन व पाण्याच्या वापराबाबत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित कंपन्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी.
कारवाई न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा
नागरिकांच्या तक्रारींकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात मोठे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागरिक व शेतकरी बांधवांनी दिला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा, शेतीचा, पाण्याचा आणि पर्यावरणाचा प्रश्न दुर्लक्षित करू नये, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.
“प्रदूषणाच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून नागरिक व शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. प्रशासनाने केवळ पाहणी न करता तक्रारींची वस्तुस्थिती तपासून योग्य ती कारवाई करावी,” अशी मागणी नागरिकांनी केली.
लेखी तक्रार सादर करताना निलेश अरविंद बेलेकर, संतोष एकनाथ बरडे, गणेश सुधाकर बेलेकर, प्रमोद कवडू पिंपळकर, मंगल मारुती टोंगे, अंकित शंकर डोहे, प्रणव संजय पुस्नाके यांच्यासह इतर शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
“आपल्या आरोग्यासाठी, शेतीसाठी, पाण्यासाठी आणि पुढील पिढीच्या भविष्यासाठी एकजूट होणे ही काळाची गरज आहे.”


