ठळक बातम्या

    आरक्षणाच्या मागणीसाठी ‘चलो नागपूर’; धोबी-परीट समाजाच्या उपोषण व साखळी उपोषणाचा नियोजन दौरा

     



    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    नागपूर : महाराष्ट्र धोबी-परीट समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्र धोबी-परीट समाज आरक्षण समन्वय समितीच्या वतीने ‘चलो नागपूर’ आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. नागपूर येथील संविधान चौकात दि. २७ ऑक्टोबर २०२६ पासून उपोषण व साखळी उपोषण आयोजित करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाजबांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी नियोजन दौरा आयोजित करण्यात आला आहे.

    या नियोजन दौऱ्याचा प्रारंभ शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात येणार असून, दौऱ्यात विविध ठिकाणी समाजबांधव व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आंदोलनाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

    दौऱ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे— बुलढाणा (शेगाव) येथे सकाळी १० वाजता, अकोला येथे दुपारी ३ वाजता, वाशिम येथे सायंकाळी ६ वाजता तर पुसद येथे रात्री ८ वाजता नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

    आरक्षणाच्या मागणीसाठी होणाऱ्या या आंदोलनात महाराष्ट्र धोबी-परीट समाजातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र धोबी-परीट समाज आरक्षण समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

    “आरक्षण आमचा हक्क आहे” आणि “एकजूट संघर्ष विजय” या भूमिकेतून समाजाने संघटित होऊन आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

    Photo