ठळक बातम्या

    विद्यार्थ्यांना जीवनाची परीक्षा पास होण्यासाठी घडविले! नारायण जवळकर यांचे प्रतिपादन

     नारायण जवळकर; जैताई मंदिरात उत्कृष्ट अध्यापक पुरस्काराने सन्मानित

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : “विद्यार्थ्यांनी केवळ शालेय परीक्षा उत्तीर्ण व्हावे यासाठी नव्हे, तर त्यांनी जीवनाची परीक्षा पास व्हावी, या उद्देशाने मी आयुष्यभर अध्यापनाचे कार्य केले. अध्ययन-अध्यापनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांना घडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. शिक्षकांची दृष्टी आईच्या दृष्टीसारखी असावी,” असे प्रतिपादन प्राचार्य राम शेवाळकर स्मृत्यर्थ प. पू. मामा क्षीरसागर उत्कृष्ट अध्यापक पुरस्काराचे मानकरी नारायण जवळकर यांनी केले.

         श्री जैताई मंदिरात सुरू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवांतर्गत प्राचार्य राम शेवाळकर स्मृत्यर्थ परमपूजनीय मामा क्षीरसागर उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी जैताई मंदिराच्या प्रांगणात पार पडला. 

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. स्वानंद पुंड होते. यावेळी व्यासपीठावर जैताई मंदिराच्या अध्यक्ष भारती सरपटवार, सचिव ह.भ.प. मनु महाराज तुगनयात, अन्नछत्र समितीचे मुन्ना पोद्दार  उपस्थित होते. 

    दारव्हा येथील उत्कृष्ट शिक्षक नारायण जवळकर यांना नागपूर येथील अविनाश सेनाड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

          पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना जवळकर म्हणाले की, हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद असून, तो जैताई मातेचा प्रसाद म्हणून स्वीकारत आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करू शकतो. आपल्या अध्यापनाच्या प्रवासात अनेक विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी घडविता आले, हे समाधान आहे. विद्यार्थ्यांच्या चुका सुधारताना त्यांच्याप्रती ममत्व आणि आपुलकी कायम ठेवली. मांजर आपल्या पिलांना तोंडात धरताना त्यांना इजा होऊ देत नाही, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शिस्त लावताना त्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीसाठी शिक्षकांनी संवेदनशीलतेने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

     त्याआधी जैताई देवस्थानच्या अध्यक्ष भारतीताई सरपटवार यांनी मामा क्षीरसागर यांच्या नावाने प्राचार्य राम शेवाळकर यांच्या स्मृत्यर्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचा इतिहास श्रोत्यांसमोर मांडला. याआधी हा पुरस्कार सतीश तराळ, दीपक नवले, वैजनाथ खडसे, गजानन कासावार, प्रा. स्वानंद पुंड, सरोज भंडारी, विवेक कवठेकर यांना दिल्याचे सांगितले. 

        अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. स्वानंद पुंड म्हणाले की, मनुष्य म्हणून जन्माला येणे दुर्मिळ आहे आणि त्यात शिक्षक होणे त्याहूनही दुर्मिळ आहे. सळसळत्या चैतन्याने भरलेल्या विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य शिक्षक करतात. गुरूचे आचरण पाहून विद्यार्थ्यांना त्याच्याप्रमाणे वागण्याची प्रेरणा मिळते, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे आचार्य होय. या व्याख्येत चपखल बसणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे आजचे पुरस्कारप्राप्त शिक्षक नारायण जवळकर आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

    कार्यक्रमाची सुरवात अमृता अलोणे व ऐश्वर्या अलोणे यांचा स्वागत गीताने करण्यात आली. प्रास्ताविक जैताई मंदिराचे सचिव ह.भ.प. मनु महाराज तुगनयात यांनी केले. पुरस्कार वितरक अविनाश सेनाड यांचा परिचय तुषार नगरवाला यांनी करून दिला. सूत्रसंचालन जैताई सेवक सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले, तर आभार मंदिराचे विश्वस्त प्रा. चंद्रकांत अणे यांनी मानले. रेणुका अणे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.



    Photo