ठळक बातम्या

    “गुन्हेगारांना तात्काळ अटक झालीच पाहिजे!” महसूल सेवक संघटनेची मागणी


    विदर्भ वार्ता | प्रतिनिधी
    मारेगाव: दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ मौजा कोसारा येथील रेती घाटावर आज पहाटे ३ ते ४ वाजताच्या दरम्यान घडलेली घटना संपूर्ण वणी-मारेगाव परिसराला हादरवून सोडणारी ठरली आहे. गस्तीवर असलेल्या महसूल सेवक दिलीप नानाजी पचारे आणि पोलीस पाटील गाणार यांच्या अंगावर रेती तस्करांनी जाणीवपूर्वक ट्रॅक्टर घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    या बेछूट हल्ल्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून, कायमचे अपंगत्व आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सदर पीडितांवर वणी येथील डॉ. कावडे यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटना घडली तेव्हा दोन्ही अधिकारी राजकीय पाठबळ असलेल्या रेती माफियांच्या अवैध उत्खननावर कारवाई करत होते. त्यांचे संयमित पण ठाम कारवाई पाहून संतापलेल्या तस्करांनी थेट गाडी चढवत सरकारी यंत्रणेवर बिनधास्त हल्ला केला.
    या निर्घृण कृत्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.


    वणी महसूल सेवक (कोतवाल) संघटनेने या घटनेचा जाहीर निषेध नोंदवत, ट्रॅक्टर चालक व मालकावर हत्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तुरळक कारवाई नव्हे, तर कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी जोरात केली आहे.संघटनेचे म्हणणे आहे की—“अवैध रेती माफियांना राजकीय पाठबळ असल्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले वाढले आहेत. हा हल्ला नाही, तर प्रशासनालाच दिलेला थेट इशारा आहे. आरोपींना तात्काळ अटक झालीच पाहिजे.”


    या घटनेने वणी-मारेगाव परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. लोक प्रशासनाकडून कडक कारवाईची अपेक्षा करत आहेत. ही घटना फक्त दोन कर्मचाऱ्यांवरचा हल्ला नाही…
    ही आहे कायदा व सुव्यवस्था मोडून काढण्याचा निर्भीड प्रयत्न!
    Photo