ठळक बातम्या

    नायगाव शिवारात रेल्वेची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू – मोठा भाऊ अपघातात नागपुरात उपचाराधीन, माळीकर कुटुंबावर दुहेरी संकट

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : नायगाव शिवारातील रेल्वे मार्गावर शुक्रवारी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास एका तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला मृत तरुणाची ओळख पटली नव्हती.

    मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव शिवारातून रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या गाडीची संबंधित तरुणाला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की मृतदेहाचे दोन तुकडे झाल्याचे सांगितले जाते. ही घटना अपघाताने घडली की संबंधित तरुणाने आत्महत्या केली, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.

    घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तसेच वणी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

    दरम्यान, मृत तरुणाची ओळख अद्वैद विजय माळीकर (रा. नांदेपेरा रोड, लॉयन्स स्कूलच्या मागे) अशी झाल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेमागील नेमके कारण काय, याचा पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

    विशेष म्हणजे, एक दिवस आधीच मृत तरुणाच्या मोठ्या भावाचा अपघात झाल्याने त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरु आहेत. त्यावेळी वडील व काका नागपूर येथे असल्याने दरम्यान लहान मुलगा मरण पावल्याची बातमी माळीकर कुटुंबाला कळताच ते नागपूरवरून तातडीने वणीसाठी निघाले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे माळीकर कुटुंबावर दुहेरी संकट ओढवले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



    Photo