विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : येथील पत्रकार रवि ढुमणे आत्महत्या प्रकरणात आता एक अत्यंत महत्त्वाची व धक्कादायक अपडेट समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी रवि ढुमणे यांनी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली असून, या नोटमधून शेती व्यवहारातील मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या सुसाईड नोटमध्ये वणीतील एका सुप्रसिद्ध व्यावसायिकाचे नाव नमूद करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
सुसाईड नोटनुसार, रवि ढुमणे यांची स्वतःची शेती होती व ती विकण्याचा त्यांचा विचार होता. याच दरम्यान त्यांनी त्यांच्या परिचयातील वणीतील एका व्यावसायिकाशी शेती विक्रीबाबत तोंडी व्यवहार केला. सदर व्यावसायिकाने शेतीवर लोन मंजूर झाल्यानंतर खरेदी करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर संबंधित शेतीवर मोठ्या प्रमाणात कर्ज उचलण्यात आले. मात्र “आज सौदा करू, उद्या करू” असे म्हणत शेतीचा अंतिम व्यवहार कधीच पूर्ण करण्यात आला नाही.
या शेतीवर कर्ज उचलले गेल्यामुळे जमिनीवर बोझा चढला होता. परिणामी रवि ढुमणे यांना ती शेती दुसऱ्या कोणालाही विकता येत नव्हती. दरम्यान बँकेकडून सतत फोन व नोटीस येऊ लागल्याने ते प्रचंड मानसिक तणावात होते. आर्थिक फसवणूक, वाढते कर्ज आणि बँकेचा दबाव यामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे.
या प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे रवि ढुमणे यांच्या पत्नीच्या नावे गडचांदूर येथील एका अर्बन बँकेतून शेतीवर मोठे कर्ज घेण्यात आले आहे. हे कर्ज शेतीच्या किमतीपेक्षाही जास्त असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रवि ढुमणे व त्यांच्या पत्नी कधीही बँकेत गेले नसताना त्यांच्या नावे कर्ज कसे मंजूर झाले, असा सवाल मृत पत्रकाराचे पुत्र नयन ढुमणे यांनी उपस्थित केला आहे.
या संदर्भात नयन ढुमणे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संबंधित व्यावसायिकासह त्याच्या चार साथीदारांनी संगनमत करून त्यांच्या वडिलांच्या शेतीवर बेकायदेशीररित्या कर्ज उचलले आणि या आर्थिक फसवणुकीमुळेच त्यांच्या वडिलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे पत्रकार रवि ढुमणे (वय ५५), रा. विद्यानगरी, वणी यांनी दिनांक १५ डिसेंबर रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी सुमारे १० वाजता ही घटना उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एका डायरीत सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या नोटमधून शेती व्यवहारातील फसवणूक स्पष्ट होत असल्याने या प्रकरणात पुढे कोणती कायदेशीर कारवाई होते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
