ठळक बातम्या

    कोळशाच्या धुळीमुळे वणी शहर होरपळले; घराघरांत काळी धूळ, कोळसा सायडिंग हटवण्याची जोरदार मागणी

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : कोळसा खाणी व कोळसा वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड धुळीमुळे वणी शहर अक्षरशः होरपळून निघाले आहे. शहरातील रस्ते, बाजारपेठा, वसाहती व शाळा परिसर सतत कोळशाच्या धुळीने झाकले जात असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

    परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की घराच्या फरशीवर काळ्या धुळीची बुकटी थरावर थर साचत आहे. घर झाडताना व फरशी पुसताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दिवसातून अनेकदा स्वच्छता करूनही काही वेळातच पुन्हा धूळ साचत असल्याने गृहिणी, वृद्ध व लहान मुले अक्षरशः हैराण झाले आहेत.

    या सर्व समस्येचे प्रमुख कारण वणी शहराच्या अगदी बाजूलाच असलेली कोळशाची सायडिंग असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सायडिंगमधून कोळशाची लोडिंग-अनलोडिंग व अवजड वाहतुकीमुळे प्रचंड प्रमाणात धूळ हवेत मिसळत असून त्यामुळे संपूर्ण शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे.

    यामुळे “वणी शहरालगतची कोळशाची सायडिंग तात्काळ व कायमस्वरूपी हटवावी” अशी जोरदार धारणा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. आरोग्याच्या प्रश्नावर तडजोड नको, शहराबाहेर पर्यायी ठिकाणी सायडिंग स्थलांतरित करावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.

    प्रशासन व कोळसा कंपन्यांनी वेळकाढूपणा थांबवून तात्काळ ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे. वणी शहराचे आरोग्य व भवितव्य धोक्यात असून आता निर्णायक कारवाईचीच गरज असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

    अक्षय कवरासे..... 

    Photo