विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : वणी शहरात ८ डिसेंबर २०२५ रोजी पंचशील नगर परिसरात झालेल्या सुगंधित तंबाखू जप्तीच्या प्रकरणात पोलिसांच्या संशयास्पद कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकरणातील दोषी तपास अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून आरोपी व वाहनावर कठोर कारवाई करण्याची मागणी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य सुभाष शेंडे यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. ८ डिसेंबर रोजी पंचशील नगर येथील जागरूक नागरिकांनी ‘११२’ क्रमांकावर दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची खेप पकडली होती. या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
मात्र, गुन्ह्यात प्रत्यक्ष वापरलेले वाहन (क्रमांक MH-24-BL-7051), त्याचा चालक व मालक यांची माहिती उपलब्ध असूनही आजतागायत सदर वाहन जप्त न करण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्ष साक्षीदार उपलब्ध असतानाही तपासात होत असलेली दिरंगाई ही जाणीवपूर्वक आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
तपास अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद असून, यामुळे शहरात तंबाखू माफियांना पोलिसांचे अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
युवासेनेच्या वतीने गाडी क्रमांक MH-24-BL-7051 तात्काळ जप्त करून तिचा मालक व चालकावर कठोर कारवाई करण्याची, तसेच तंबाखू मागवणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या संबंधित तपास अधिकाऱ्याला त्वरित निलंबित करण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
जर येत्या ४८ तासांत ठोस कारवाई झाली नाही, तर युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे व युवासेना समन्वयक आयुष ठाकरे, सुरेश शेंडे यांनी दिला आहे. जनतेचा पोलिसांवरील विश्वास टिकवण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
