विदर्भवार्ता|प्रतिनिधी
राजूरा : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अंतरगाव (अ) येथे दि. २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा. सौ. प्रतिमा सं. रासपल्ले (अध्यक्षा, शाळा व्यवस्थापन समिती) यांनी भूषविले.कार्यक्रमास मा. श्री. भास्कर कन्नाके (सरपंच, ग्रामपंचायत अंतरगाव अ.) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मा. शीतल उपासे (उपसरपंच), रमेश लोखंडे (उपाध्यक्ष शा. व्य. स.), विठोबाजी लोणारे, निलेश खोब्रागडे (सदस्य ग्रा. पं.), भाग्यश्री कोव्हे, जीवनकला चौधरी, धर्मराज रासपल्ले, सोनाली भोयर, राकेश चौधरी, भावनाताई लोखंडे, वच्छलाताई मडपती, मारोती सोयाम तसेच दिनपाल बनकर (मुख्याध्यापक) यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करून मुख्य मार्गाने प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय व माकुडी रेल्वे स्टेशन येथे ध्वजारोहण करण्यात आले. शाळेत झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करणारी भाषणे केली.
सायंकाळी ८ वाजता शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, संत गाडगे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, नक्कल, पोवाडे व एकांकिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सर्वच विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या सुप्त कलागुणांचे दर्शन घडविले.
यावेळी नुकतेच बदलीने रुजू झालेले शिक्षक राजकुमार चिंचोलकर यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कबड्डी युवा मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. चिंचोलकर सर यांनी तर आभार प्रदर्शन मा. बाळकृष्ण मसराम सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.








