विदर्भवार्ता|प्रतिनिधी
झरी : तालुक्यातील झरी जामणी अंतर्गत मौजा बिरसाईपेठ येथे संकट मोचन ग्राम समिती या समितीची सार्वजनिकरीत्या पाळलेली एक गाय आहे. सदर गाय गावालगतच्या शेतात गेली असता, मु. खरबडा येथील नामे शेख सहेजाद यांनी दि. १३/०२/२०२६ रोजी “गाईमुळे शेतात नुकसान होत आहे” या कारणावरून त्या मुक्या जनावरावर धारदार कुराडीने हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना घडली.
ही बाब समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या व गावकऱ्यांच्या लक्षात येताच, संकट मोचन ग्राम समितीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी पोलीस ठाणे पाटण येथे जाऊन तक्रार नोंदवली.
तक्रार नोंद झाल्याची माहिती मिळताच, नामे शेख सहेजाद यांनी बिरसाईपेठ गावात येऊन सदर कृत्य आपणच केल्याची कबुली दिली. तसेच, ग्राम समिती व गावातील सर्व नागरिकांसमोर जाहीर माफी मागून, भविष्यात असे कृत्य पुन्हा घडणार नाही, अशी ग्वाही दिली. जखमी गाईच्या जखमा पूर्णपणे बऱ्या होईपर्यंत वेळोवेळी काळजी घेऊन उपचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. उपचारादरम्यान गाईला काहीही गंभीर नुकसान झाल्यास संपूर्ण गाईची भरपाई देण्याची तयारीही त्यांनी सर्वांसमोर स्पष्ट केली.
या प्रकारानंतर गावात शांतता प्रस्थापित झाली असून, ग्रामस्थांनी मुक्या जनावरांच्या संरक्षणासाठी कठोर भूमिका घेण्याची मागणी केली आहे.


