ठळक बातम्या

    वणी शहरात धारदार ६ अवजारे जप्त; दरोडा प्रकरणातील फरार आरोपीही जेरबंद

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : यवतमाळ जिल्ह्यात गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळने मोठी कारवाई करत वणी शहरात धारदार शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका इसमास अटक केली आहे. तसेच दरोडा प्रकरणातील दोन महिन्यांपासून फरार असलेला आरोपीही जेरबंद करण्यात आला आहे.

    मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता व अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व पांढरकवडा-वणी उपविभाग पथकाने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘ऑल आऊट ऑपरेशन’ दरम्यान ही कारवाई केली.

    मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, माळीपुरा वणी येथील निलेश उर्फ अनिकेत कुमेश सोनटक्के (वय २२) हा भविष्यात दखलपात्र गुन्हा करण्याच्या हेतूने आपल्या घरात अवैधरित्या धारदार शस्त्रे साठवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पंचांसमक्ष त्याच्या घराची झडती घेतली असता तलवारी, चाकू व कुकरी अशी एकूण ६ धारदार अवजारे (अंदाजे किंमत १४,००० रुपये) जप्त करण्यात आली.

    या प्रकरणी पोलीस स्टेशन वणी येथे अपराध क्रमांक १९३/२०२६ कलम ४/२५ आर्म ॲक्ट सहकलम १३५ मपोका अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

    दरम्यान, पोलीस स्टेशन वणी येथे दाखल असलेल्या अपराध क्रमांक ७३५/२०२५ (कलम ३३१(६), ३०९(६) भा.न्या.सं.) अंतर्गत कोंडावार ज्वेलर्स, वणी येथे घडलेल्या दरोडा प्रकरणातील दोन महिन्यांपासून फरार असलेला आरोपी अनिकेत उर्फ बांडी प्रकाश ऐगडवार (वय २६, रा. यवतमाळ) यासही पोलिसांनी यवतमाळ येथे सापळा रचून ताब्यात घेतले. त्यास पुढील कारवाईसाठी वणी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक सतीश चव्हरे (स्था. गु. शा. यवतमाळ) यांच्या नेतृत्वाखाली सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि धनराज हाके, पोहवा सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, पोशि. सलमान शेख, रजनिकांत मडावी, चापोना सतीश फुके आदींच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



    Photo