विदर्भवार्ता|प्रतिनिधी
घुग्गुस : “गोपाला.. गोपाला... देवकीनंदन गोपाला” या संतवाणीच्या गजरात संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंती महोत्सवाचे आयोजन धोबी परीट जनकल्याण संस्था, घुग्गुस यांच्या वतीने दि. २३ व २४ फेब्रुवारी २०२६ रोजी संत गाडगेबाबा स्मारक, घुग्गुस येथे भक्तिभावात संपन्न झाले.
दि. २३ फेब्रुवारी रोजी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर घुग्गुस शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संतविचारांचा जागर केला.
दि. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता श्री गुरुदेव व शारदा महिला भजन मंडळाने आपल्या सुमधुर आवाजात भजन कार्यक्रम सादर करून वातावरण भक्तिमय केले.
सायंकाळी ४ वाजता प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. डी. डी. सोनटक्के (संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य धोबी परीट सर्व भाषिक महासंघ), मा. श्री. भैय्या रोहणकर (प्रदेश उपाध्यक्ष व ज्येष्ठ मार्गदर्शक), मा. श्री. दिलीप शिरपूरकर (प्रदेश महासचिव), मा. श्रीमती,रोशनी स्वप्नील वरगंटे (महीला बालकल्याण सभापती नगरपरिषद चामोर्शी) मा. श्री.माणीक भोस्कर (प्रदेश सचिव) तसेच मा. श्री. संजय चिंचोलकर(सांज दैनिक यवतमाळ मार्मिक प्रतिनिधी) उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आपल्या भाषणात डी. डी. सोनटक्के यांनी
संत गाडगेबाबांचे कार्य, समाजप्रबोधनाची परंपरा व स्वच्छतेचा संदेश यांचे महत्त्व अधोरेखित केले.
तर भैय्या रोहणकर यांनी धोबी परीट जनकल्याण संस्था घुग्गुसच्या वतीने गाडगेबाबा भवन विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची माहिती देत जोरगेवार (आमदार, चंद्रपूर) यांनी भवन विकासासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
सायंकाळी ५ वाजता घुग्गुस नगरपालिकेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरसेवकांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सायंकाळी ७ वाजता राष्ट्रीय कीर्तनकार व सप्तखंजिरी वादक कु. क्रांती ताई काळे यांच्या जाहीर प्रबोधनपर कीर्तनाने कार्यक्रमाला उंची गाठली. त्यांनी आपल्या मधुर वाणीतून संत तुकडोजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व पटवून देत आजच्या पिढीला संतविचारांची गरज का आहे, हे प्रभावीपणे मांडले.
या दोन दिवसीय महोत्सवाला सर्व समाजबंधू-भगिनी तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल धोबी परीट जनकल्याण संस्था, घुग्गुस यांनी सर्वांचे आभार मानले.























