विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आज स्वच्छतेचा जागर उसळला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र भूमीत वणी येथील शिवसैनिकांनी संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त भव्य स्वच्छता अभियान राबवत दोन महापुरुषांना कृतीतून मानवंदना अर्पण केली.
“स्वच्छता हाच खरा धर्म” हा संत गाडगेबाबांचा संदेश अंगीकारत शिवसैनिकांनी झाडू हातात घेत गड परिसर स्वच्छ केला. स्वराज्य, शिस्त आणि स्वाभिमानाचा आदर्श देणाऱ्या शिवरायांच्या राजधानीत स्वच्छतेचा संस्कार रुजवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
शिवरायांचा स्वराज्याचा विचार आणि संत गाडगेबाबांचा समाजप्रबोधनाचा संदेश यांचा संगम रायगडाच्या पायथ्याशी अनुभवायला मिळाला. गड स्वच्छ ठेवणे हीच खरी शिवभक्ती असल्याचे यावेळी शिवसैनिकांनी सांगितले.
या अभियानात युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, मा. शहर प्रमुख राजू तुरणकर, मा. जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर, नंदू ढूमने, दिवाकर नागतुरे, अरविंद कापसे, मनिष बतरा, परशुराम पोटे, चेतन उलमाले, मिलिंद बावणे, आदित्य नामेश बिलोरीय, श्रीकांत यशवंत उके, रौनक रवी बिलोरीया, सुयेश नगराळे, संजोग झाडे, तुषार दुरुटकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
“गड स्वच्छ – विचार शुद्ध – समाज जागृत” हा संदेश देत शिवसैनिकांनी जयंती साजरी करण्यापेक्षा कृतीतून आदर्श निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला.


