विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड, श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालय, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने वणी येथील वसंत जिनिंग सभागृहात दिनांक २२ फेब्रुवारी ला सहकार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते....
या शिबिराचे उद्घाटन फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. देविदासजी काळे (अध्यक्ष, श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी) होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मेश्राम साहेब (उपनिबंधक), राजूदासजी जाधव (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन), शांतीलाल सिंगी (महासचिव), दादारावजी तुपकर (कोषाध्यक्ष), सुदर्शनजी भालेराव (उपकार्याध्यक्ष), धनंजयजी तांबेकर (संचालक), तसेच गोदावरी मल्टीस्टेट पतसंस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रा. कवडुजी नगराळे (तज्ञ संचालक, यवतमाळ जिल्हा सहकार बोर्ड) प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा भव्य हार घालून सत्कार करण्यात आला.
प्रशिक्षण शिबिरात धनंजयजी तांबेकर यांनी “संस्थेच्या विकासात संचालक मंडळाची भूमिका” या विषयावर सविस्तर विश्लेषण करून मार्गदर्शन केले.
प्रा. कवडुजी नगराळे यांनी पतसंस्थेचे निधी व्यवस्थापन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. उद्घाटक काकासाहेब कोयटे यांनी पतसंस्थांचे व्यवस्थापन, सध्याची परिस्थिती आणि शासनाची धोरणे यावर सखोल मार्गदर्शन केले. तर ॲड. देविदास काळे यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणातून सहकार क्षेत्रातील जबाबदाऱ्या अधोरेखित केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर यांनी केले. सूत्रसंचालन संजय दोरखंडे (मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी) यांनी केले, तर आभार प्रदर्शन संचालक परीक्षित एकरे यांनी केले.
या प्रशिक्षण शिबिराला वणी व परिसरातील विविध पतसंस्था, मल्टीस्टेट सोसायट्यांचे कर्मचारी, अधिकारी व संचालक मंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


