विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेना संघटनेत कार्यरत असलेले वणी विधानसभा क्षेत्रातील उपजिल्हा प्रमुख अजिंक्य सु. शेंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे. त्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उद्देशून दिलेल्या पत्राद्वारे हा निर्णय कळविला.
पत्रात शेंडे यांनी नमूद केले आहे की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी निष्ठा ठेवून त्यांनी अनेक वर्षे युवासेनेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविले. वणी शहरात युवक-विद्यार्थ्यांशी संपर्क साधत प्रवेश मोहिमा, गरजू नागरिकांना शासकीय कागदपत्रांसाठी मदत, कोविड काळात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देणे, औषध फवारणी, तसेच विविध जयंतीनिमित्त उपक्रमांचे आयोजन केल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
तसेच ‘सामना’ या अधिकृत मुखपत्रातून चार वेळा उपजिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती मिळाल्याचे सांगत, तो आपल्या कार्याचा सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, काही काळापासून स्थानिक पातळीवर आपल्या कार्यात अडथळे निर्माण होत असून, महत्त्वाच्या बैठका, निर्णयप्रक्रिया व नगरपरिषद सीट वाटपात जाणीवपूर्वक विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
वणी शहरातील युवासेना शहर प्रमुख पद दीर्घकाळ रिक्त असल्याचे तसेच झरी–मारेगाव परिसरातील संघटनात्मक कामकाज ठप्प अवस्थेत असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. वारंवार कळवूनही याची दखल घेतली गेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
वणी विधानसभा क्षेत्रातील आमदारांना निवडून आणण्यासाठी निष्ठेने काम केल्याचा उल्लेख करत, निष्ठावंत कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “मीच म्हणजे पक्ष” अशी भूमिका घेत इतर पदाधिकाऱ्यांना डावलले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमान जपत आपण युवासेना उपजिल्हा प्रमुख (वणी विधानसभा) पदाचा राजीनामा सादर करत असल्याचे शेंडे यांनी स्पष्ट केले. पक्ष व नेतृत्वाबद्दल मनात कायम आदर राहील, असेही त्यांनी शेवटी नमूद केले आहे.
दरम्यान, या राजीनाम्यामुळे वणीतील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



