विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : पाटण पोलीस स्टेशन हद्दीतील झरी तालुक्यातील शिबला या छोट्याशा गावात ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी संशयाच्या भावनेतून एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत मध्यस्थी करण्यासाठी गेलेली मृताची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
शिबला गावात सर्व कुटुंबे शांततेने नांदत होती. सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा सण साजरा सुरू असतानाच शेजारील दोन कुटुंबांत किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून शालीक आत्राम (वय ३५) याने शेजारील संतोष टेकाम (वय ४६) यांच्यावर सुऱ्याने सपासप वार केले. गंभीर जखमी झाल्याने संतोष टेकाम यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, वाद मिटविण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पत्नीला देखील सुऱ्याचा वार लागल्याने ती गंभीर जखमी झाली.
घटनेची माहिती मिळताच पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी झरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
या घटनेमुळे शिबला गावासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पाटण पोलीस करीत आहेत.

