विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, वणी यांच्या वतीने आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक व पत्रकार प्रा. रणजित मेश्राम यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. दि. ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता शासकीय विश्रामगृह, वणी येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या कार्याची आठवण काढत श्रद्धांजली वाहिली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष मा. बंडू कांबळे सर होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विचार मंचचे ज्येष्ठ सल्लागार प्रा. पुरुषोत्तम पाटील सर यांनी प्रा. रणजित मेश्राम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करत आदरांजली अर्पण केली. त्यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटे शांतता पाळून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली वाहिली.
सभेत बोलताना प्रा. पुरुषोत्तम पाटील सर यांनी प्रा. रणजित मेश्राम यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, प्रा. मेश्राम यांनी आपल्या आयुष्यात अनेक सामाजिक, साहित्यिक व संघटनात्मकव संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळत आंबेडकरी विचार समाजात पोहोचविण्याचे मोठे कार्य केले. ते भारिप बहुजन महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष, तसेच खनिकर्म मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. याशिवाय ते एक संवेदनशील पत्रकार आणि आंबेडकरी साहित्यिक म्हणूनही समाजात ओळखले जात होते. त्यांच्या लेखनातून व विचारातून वंचित, शोषित व पीडित घटकांच्या समस्या मांडल्या जात असत.
यावेळी वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, प्रा. रणजित मेश्राम यांच्या निधनामुळे आंबेडकरी विचारसरणीला मोठी हानी झाली असून ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. समाजातील अन्याय, विषमता आणि वंचितांच्या वेदना मांडण्यासाठी अधिकाधिक साहित्यिक, पत्रकार व विचारवंत पुढे आले पाहिजेत. समाजात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. बंडू कांबळे सर यांनीही आपल्याशोकसंवेदना व्यक्त करत प्रा. रणजित मेश्राम यांच्या कार्याची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, मेश्राम सरांनी आयुष्यभर आंबेडकरी चळवळ, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी प्रामाणिकपणे काम केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच समाजाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या श्रद्धांजली सभेला विचार मंचचे उपाध्यक्ष मा. संजय तेलंग सर, मा. घनश्याम ठमके सर, मा. रामदास कांबळे सर, पुंडलिक पथाडे सर, मा. विवेक तेलंग सर, मा. कवडू जीवणे सर, मंगल तेलंग सर, मा. दादाजी घडले, मा. गौतम धोटे, राजेश पुनवटकर सर, तेलतुंबळे साहेब, गंगाधर रामटेके, तसेच अशोक निमसटकर यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
सभेच्या शेवटी उपस्थितांनी प्रा. रणजित मेश्राम यांच्या कार्याला स्मरून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमात आंबेडकरी विचारांची जोपासना करण्याचा आणि समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
विदर्भवार्ता|पत्र परीवार वणी कडून भावपूर्ण श्रध्दांजली


