ठळक बातम्या

    घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश; दोन जण ताब्यात, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

     


    विदर्भवार्ता । प्रतिनिधी 

    यवतमाळ : जिल्ह्यात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला असून दोन जणांना ताब्यात घेत २१ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    मारेगाव येथील फिर्यादी सुशिल जगेंवार यांनी ७ एप्रिल २०२६ रोजी त्यांच्या घरातून अज्ञात इसमांनी सोन्या-चांदीचे दागिने चोरी केल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार मारेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच चोरीतील दागिने पुसद येथील आरोपी नथ्थु कुरकुटे व दत्ता कुरकुटे यांच्या माध्यमातून उमरखेड येथील सराफा व्यावसायिकास विक्री केल्याचे समोर आले.

    त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही बालकांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासादरम्यान पुसद येथे धाड टाकून चोरीस गेलेले १०० टक्के सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २१,३७,७७१ रुपये इतकी आहे.

    या प्रकरणात आरोपी दत्ता सटवाजी कुरकुटे (रा. नागवाडी, ता. पुसद) याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मारेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

    Photo