विदर्भवार्ता । प्रतिनिधी
वणी - यवतमाळ जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून वणी येथे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत ‘MD (मेफेड्रोन)’ या घातक ड्रग्सची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली. या कारवाईत एकूण २,३०,४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू असून, विशेषतः सिंथेटिक ड्रग्स ‘MD’च्या वाढत्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे.
१८ एप्रिल २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी देशमुख वाडी परिसरातील बसस्थानकाच्या मागील रस्त्यावर सापळा रचला. संशयितांना अडवून चौकशी केली असता राहुल दिलीप ठाकुरवार (वय ४०) व प्रीतम लिलाराम केशवाणी (वय ४४) अशी त्यांची ओळख पटली.
पंचासमक्ष झडती घेतली असता आरोपींकडून २१ ग्रॅम १८ मिलीग्रॅम MD ड्रग्स (किंमत १,२७,०८० रुपये), तसेच नगदी, मोबाईल आणि मोपेड असा एकूण २,३०,४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे, गोपाल उंबरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
या धडक कारवाईमुळे ड्रग्स विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे –
“अंमली पदार्थांचा व्यापार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही!”

