विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : जपानी भाषा ही केवळ एक भाषा नसून आपल्यासारख्या अनेक सामान्य घरातील , अगदी खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना देखील उत्तम रोजगाराचे साधन आहे. मी स्वतः विज्ञान विषयात शिक्षण घेऊन देखील आज जपानी भाषेच्या अध्ययनाच्या माध्यमातून घरी माझ्या गावी बसून जपानमध्ये एखाद्या इंजिनियर प्रमाणे काम करीत आहे. आपणास देखील ही भाषा अशाच स्वरूपात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जपानी भाषा शिकण्यासाठी उपलब्ध साधन सामुग्रीचा उपयोग करावा." असे आवाहन गणेश फुटाणे यांनी केले.
लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा आयोजित, विद्यावाचस्पती प्राचार्य राम शेवाळकर स्मृती सतराव्या वर्षीच्या व्याख्यानात जपानी भाषा करिअर आणि संधी या विषयावर ते व्यक्त होत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार तर व्यासपीठावर सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के, संचालक अनिल जयस्वाल, प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे हे मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये प्राचार्य प्रसाद खानझोडे यांनी आपल्या सामान्य शिक्षणानंतर केवळ एखाद्या वेगळ्या भाषेच्या अभ्यासातून किती सुंदर उपजीविका देखील साधता येते हे दाखविण्यासाठीच आपल्या महाविद्यालयाच्या या माजी विद्यार्थ्याला आमंत्रित केले आहे हे अधोरेखित केले.
आपल्या मोजक्या आणि नेटक्या सादरीकरणात गणेश शंकरराव फुटाणे यांनी जपान मधील सामुहिक कार्य भूमिका, तेथील लोकांच्या जीवनात असणारे नियम, वेळेचे नियोजन, एकच चूक पुन्हा होऊ न देण्यासाठी ते करीत असलेले विशेष प्रयत्न, जपानी भाषेसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या हिराकाणा, ताताकाना आणि कांजी या तीन लिपी, शिक्षणाकरता उपयोगी असणारे पाच स्तरीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम इ. विषयी नेमकी माहिती सांगत, आपल्या या उन्नती मध्ये सध्या जपानमध्ये असणाऱ्या मूळच्या वणीकर महेश देशपांडे यांच्या मौलिक सहकार्याचा आवर्जून कृतज्ञतेने उल्लेख केला.
प्राचार्य प्रसाद खानझोडे आणि विद्यार्थी विकास विभाग संयोजक डॉ.अभिजित अणे यांनी वक्त्यांना विविध प्रश्न विचारून बोलते केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या भाषेच्या अभ्यासासाठी आवश्यक असणारी सर्व सामुग्री सुचवावी असे म्हणत विजय मुकेवार यांनी जपानमध्ये आवश्यक चार लाख रोजगारापैकी किमान चाळीस हजार तरी भारतीयांना प्राप्त व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ अभिजित अणे यांनी केले.

