ठळक बातम्या

    भागवत कथेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश; युवा पिढीसाठी ह.भ.प. रामेश्वर महाराज खोडे यांचे प्रभावी प्रबोधन

    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

     वणी : वणी येथील टागोर चौकातील श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात १३ मार्च ते २० मार्च दरम्यान आयोजित भागवत कथेतून ह.भ.प. रामेश्वर महाराज खोडे यांनी समाजासह विशेषतः युवा पिढीला व्यसनमुक्त जीवनाचा प्रभावी संदेश दिला. अध्यात्माच्या माध्यमातून आधुनिक काळातील वाढत्या व्यसनाधीनतेवर त्यांनी थेट प्रहार करत तरुणांना सजग राहण्याचे आवाहन केले.

    गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “माझ्याकडे कोणतीही अंधश्रद्धा किंवा जादूटोणा नाही. मी फक्त गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा आधार घेत समाजप्रबोधन करतो.”

    आजच्या काळात तरुण पिढी मोबाईल, चहा, सिगारेट, तंबाखू आणि दारू यांसारख्या व्यसनांच्या जाळ्यात अडकत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी सांगितले की, “व्यसनाची सुरुवात घरातील संस्कारांच्या अभावातून होते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने मुलांवर चांगले संस्कार करणे अत्यंत गरजेचे आहे.”

    भागवत कथेच्या माध्यमातून केवळ प्रवचन न देता प्रत्यक्ष कृतीतूनही संदेश देत, प्रत्येक गावात कथा झाल्यानंतर स्वतः खराटे घेऊन ग्रामस्वच्छता करत असल्याचे त्यांनी सांगितले. मंदिर, बुद्ध विहार किंवा मशिद परिसर असो, स्वच्छतेचा संदेश सर्वत्र पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न असून, त्यांच्या या कार्यामुळे अनेक अनुयायीही स्वच्छता व व्यसनमुक्ती अभियानात सहभागी होत आहेत.

    गेल्या ३० वर्षांत लाखो लोकांनी त्यांच्या प्रबोधनातून प्रेरणा घेऊन चहा, सिगारेट, तंबाखू व दारू यांसारख्या व्यसनांचा त्याग केल्याचा उल्लेख त्यांनी केला. “स्वच्छता महत्त्वाचीच आहे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे मन आणि जीवन व्यसनमुक्त करणे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

    या वेळी भागवत सेवा समितीचे सदस्य राजू गिन्नलवार, रमेश येरणे, दीपक डेकाटे, संजय पिंपळशेंडे, नितीन निमजे, बालू गौरकार, गुलाब आवारी, रवि सोनकुसरे, सुहास नांदेकर यांच्यासह अनेक सभासद व पत्रकार उपस्थित होते.




    Photo