विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. अचलपूर मतदारसंघातील प्रभावी कामगिरीनंतर आता त्यांची पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली असून, शहराच्या राजकारणात यामुळे नवी उर्जा निर्माण झाली आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार खाडे यांच्याकडे ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वीच प्रदेश सचिव म्हणून काम करत असताना त्यांनी संघटनात्मक पातळीवर आपली छाप पाडली होती.
संजय खाडे हे केवळ राजकीय नेते नसून शेतकरी व कामगारांचे बुलंद आवाज म्हणून ओळखले जातात. विविध आंदोलन, मोर्चे आणि जनआंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी सामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा दिला आहे. अचलपूरमध्ये ग्रामीण भागात पक्ष संघटन मजबूत करत त्यांनी जनसंपर्काचे प्रभावी जाळे उभे केले. त्यांच्या याच कार्यक्षमतेवर विश्वास ठेवत काँग्रेसने आता त्यांना पूर्व नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरी मतदारसंघाची धुरा दिली आहे.
पूर्व नागपूर हा शहरातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक मतदारसंघ मानला जातो. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा भाग आज विविध सामाजिक घटक, कामगार, व्यापारी आणि युवकांच्या सहभागामुळे अधिकच महत्त्वाचा ठरतो. नागरी प्रश्न, विकासकामे आणि संघटनात्मक ताकद यावर येथे निवडणुकीचे गणित अवलंबून असते.
“पूर्ण ताकदीने काम करणार” – संजय खाडे
“पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. अचलपूरमध्ये केलेल्या कामाच्या बळावर आता पूर्व नागपूरमध्येही पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. सर्वसामान्य नागरिक, युवक, कामगार आणि महिलांशी थेट संवाद साधून तसेच स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवत संघटन अधिक बळकट करणे हेच माझे ध्येय असेल,” अशी ठाम भूमिका संजय खाडे यांनी व्यक्त केली.
खाडे यांनी आपल्या निवडीचे श्रेय हर्षवर्धन सपकाळ, प्रतिभा धानोरकर तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांना दिले.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट
या नियुक्तीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून, आगामी काळात पूर्व नागपूरमध्ये पक्ष संघटन अधिक बळकट होऊन काँग्रेस पुन्हा मजबुतीने उभी राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
----------------------------------------------



