ठळक बातम्या

    भाजप कार्यकर्त्यांसाठी वैचारिक शिदोरी; वणी येथे दोन दिवसीय 'प्रशिक्षण महाअभियान' उत्साहात संपन्न!

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 'पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६' अंतर्गत 'वणी शहर मंडल'च्या दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्गाचा समारोप नुकताच झाला. स्थानिक वसंत जिनींग हॉल येथे आयोजित या शिबिरात वणी शहरातील अपेक्षित १०५ समर्पित कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपल्या राजकीय आणि सामाजिक कौशल्यांना पैलू पाडले.

    उद्घाटन आणि पार्श्वभूमी

    कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष श्री. प्रफुल चव्हाण, माजी आमदार श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार आणि माजी जिल्हाध्यक्ष श्री. तारेंद्र बोर्डे, नगराध्यक्ष विद्याताई आत्राम,  व ईतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. "कार्यकर्ता हा भाजपचा कणा असून, त्याला वैचारिकदृष्ट्या सक्षम करणे व सरकारची कामगिरी सामान्य माणसापर्यंत पोहोचवणे हाच या प्रशिक्षणाचा मूळ उद्देश आहे," असे मत मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.


     २ दिवस, ७ सत्रे आणि तज्ज्ञ वक्ते

    दोन दिवसांच्या या कालावधीत एकूण सात महत्त्वपूर्ण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विविध विषयांवर तज्ज्ञ वक्त्यांनी मार्गदर्शन केले: 

    या दोन दिवसीय प्रशिक्षण महाभियानाची सुरुवात 'आपला इतिहास आणि विकास' या विषयाने झाली, ज्यामध्ये भाजप जिल्हाध्यक्ष श्री. प्रफुल चव्हाण यांनी मुख्य वक्ते म्हणून मार्गदर्शन केले, तर या सत्राचे अध्यक्षपद माजी आमदार श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भूषवले. दुसऱ्या सत्रात श्री. श्रीराम मेल्केवार यांनी 'कार्यपद्धती (कार्यकर्ता सांभाळणे)' या विषयावर प्रकाश टाकला, ज्याचे सत्र अध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष श्री. तारेंद्र बोर्डे होते. त्यानंतरच्या तिसऱ्या सत्रात श्री. कैलास बोंद्रे यांनी 'कार्यविस्ताराची आमची दृष्टी' या विषयावर कार्यकर्त्यांना संबोधित केले आणि या सत्राचे अध्यक्ष जेष्ठ नेते श्री. महादेवराव खाडे होते.

    दुसऱ्या दिवशीच्या चौथ्या सत्रात डॉ. नितीन खर्चे यांनी 'वैचारिक अधिष्ठान' या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले, ज्याचे अध्यक्षपद श्री. अंकुश बोढे यांनी भूषवले. पाचव्या सत्रात श्री. राजु पडगीलवार यांनी 'सोशल मीडिया, ए.आय., नमो व सरल ॲप' या आधुनिक विषयांची माहिती दिली आणि या सत्राचे अध्यक्ष श्री. संतोष डंभारे होते. सहाव्या सत्रात श्री. शंतनु शेटे यांनी 'आपल्या सरकारची कामगिरी आणि अंमलबजावणी' या विषयावर भाष्य केले, तर या सत्राचे अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष श्री. रविंद्र बेलुरकर होते. प्रशिक्षणाच्या अंतिम सत्रात गजानन भोकारे, (अध्यक्ष केमिस्ट आघाडी यवतमाळ जिल्हा) यांनी 'बूथ व्यवस्थापन आणि मन की बात' या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले आणि या सत्राचे अध्यक्षपद नगराध्यक्षा सौ. विद्या आत्राम यांनी भूषवले.

    डिजिटल परीक्षा आणि गौरव

    सध्याच्या डिजिटल युगाचे महत्त्व ओळखून कार्यकर्त्यांना केवळ प्रशिक्षणच दिले नाही, तर सत्रांच्या अखेरीस त्यांची ऑनलाइन परीक्षा देखील घेण्यात आली. या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या कार्यकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते 'डिजिटल प्रमाणपत्र' देऊन सन्मानित करण्यात आले. पहाटेचे योगासन सत्र आणि रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे या निवासी शिबिरात उत्साहाचे वातावरण होते.

    नियोजन आणि परिश्रम

    या महाअभियानाच्या यशस्वीतेसाठी वणी शहर मंडळाचे अध्यक्ष   ॲड.निलेश चौधरी, सरचिटणीस तथा संयोजक श्री. आशिष डंभारे आणि संपूर्ण वणी शहर भाजप टीमने विशेष परिश्रम घेतले.

    या प्रशिक्षणातून मिळालेली वैचारिक शिदोरी घेऊन अपेक्षित १०५ कार्यकर्ते आता आगामी काळात 'राष्ट्र प्रथम' हा विचार घेऊन जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज झाले आहेत.



    Photo