विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : " आपल्याला झालेल्या दिव्य आनंदाच्या प्राप्तीला सगळ्यांना वाटण्यासाठी नि:स्वार्थपणे कार्य करतात त्यांनाच खरे संत म्हणतात. अशा संतांची संगती हेच सर्व सुखाचे कारण असते. मात्र बाह्यरूपावरून संतांची ओळख पटवता येत नाही. अशावेळी संत साहित्यामध्ये वर्णिलेले आणि गुरुमुखातून आदेश प्राप्त झालेले सत्कर्म करीत राहणे हाच संत प्राप्तीचा उपाय आहे. " असे प्रतिपादन नागपूर येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्ती परायण श्री विश्वास बुवा पाचपोर यांनी केले.
वणीची ग्रामदेवता असणाऱ्या जैताई देवस्थानातील चैत्र नवरात्र उत्सवात आयोजित कीर्तनामध्ये जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या, " संतचरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय ! " या सुप्रसिद्ध अभंगावर ते निरूपण करीत होते.
प्रस्तावनेमध्ये जैताई देवस्थानचे सचिव ह.भ.प. भागवत कथाकार मनु महाराज तुगनायत यांनी देवस्थानच्या विविध उपक्रमांचा परिचय देत या सर्व कल्पनांची मुहूर्तमेढ करणाऱ्या स्वर्गीय माधवराव उपाध्य बाळासाहेब सरपटवार यांच्या अनुपस्थितीत प्रथमच हा उत्सव होत असल्याची खंत व्यक्त केली.
आपल्या भारदस्त आवाजाने आणि गायन कौशल्याने संपन्न अशा अत्यंत नेटक्या सादरीकरणामध्ये विश्वास बुवा पाचपोर यांनी संत संगतीचे महत्त्व, नामस्मरणाचे माहात्म्य, भगवंताकडे काय मागावे? त्यापेक्षा काय मागू नये ? याचे आवश्यक असणारे भान, अशा विविध पैलूंना स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, देवर्षी नारद यांच्या विविध कथांमधून विशद केले.
उत्तररंगांमध्ये श्रीराम नवरात्र, श्री देवी नवरात्र आणि श्री समर्थ जन्मोत्सव अशा तिन्हींची सांगड घालत त्यांनी श्री समर्थ रामदास स्वामींच्या जीवनातील काळे मामलेदारांची आणि त्यांची पत्नी सतीबाई ची कथा सादर केली.
शहापूरच्या मठाधिपती स्वरूपात सतीबाई यांची नियुक्ती ही श्री समर्थांची काळाच्या पल्याड असणारी दृष्टी त्यांनी विशेष अधोरेखित केली.
कीर्तनामध्ये अजित खंदारे यांनी संवादिनीवर तर अक्षय करसे यांनी तबल्यावर साथ संगत केली. सागर मुने यांनी सूत्रसंचालन केले. देवस्थानचे सदस्य बंडोपंत भागवत यांनी कीर्तनकारांचा सन्मान केला तर नामदेव पारखी यांच्या हस्ते आरती संपन्न झाली.
वणीकर जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद आयोजनाचे वैशिष्ट्य ठरले.


