विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा-१” या विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे आणि नागरिकांना आवश्यक महसूल सेवा सुलभपणे मिळाव्यात, या उद्देशाने हे शिबिर राबविण्यात येत आहे.
या शिबिरामध्ये महसूल विभागाच्या विविध सेवा, दाखले तसेच जमिनीशी संबंधित कामे एकाच ठिकाणी पूर्ण करून दिली जाणार आहेत. नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी प्रशासनाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
याशिवाय शिबिरात नगरपरिषद, पंचायत समिती, आरोग्य विभाग तसेच इतर शासकीय विभागांच्या सेवाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी घेता येणार आहे.
सदर शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या मंडळ भागातील शिबिराच्या दिनांकापूर्वी ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे आवश्यक सेवांसाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


