ठळक बातम्या

    महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष स्मरणार्थ समतेच्या लढ्याला अभिवादन करण्यास यवतमाळ जिल्ह्यातील माकपचे अनेक कार्यकर्ते रवाना

     

    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व जातीअंत संघर्ष समिती यांच्या वतीने १९ व २० मार्च रोजी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९२७ साली झालेल्या महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्ष स्मरणार्थ विनम्र अभिवादन करण्यासाठी महाड येथे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते महाडकडे रवाना झाले आहे.

    त्या काळात भारतीय समाजात अस्पृश्यता व जातीय भेदभाव अत्यंत तीव्र होता. दलित व वंचित समाजाला सार्वजनिक पाणीस्रोतांचा वापर करण्यासही तत्कालीन मनुवादी मानसिकता व प्रस्थापित सत्ताधाऱ्यांकडून मज्जाव केला जात होता. या अन्यायकारक व अमानुष प्रथेविरुद्ध लढा उभारत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हजारो अनुयायांसह चवदार तळे येथे जाऊन सामूहिक जलप्राशन केले आणि “पाणी हा आमचा नैसर्गिक हक्क आहे” ही घोषणा प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली.

    हा जलसत्याग्रह केवळ पाणी पिण्याच्या अधिकारापुरता मर्यादित नसून, मानवमुक्ती, स्वाभिमान आणि सामाजिक समानतेच्या हक्कासाठीचा ऐतिहासिक टप्पा ठरला. या आंदोलनाने भारतीय समाजात परिवर्तनाची नांदी घडवली आणि सामाजिक क्रांतीची ठिणगी पेटवली. पुढे २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृती दहन करून जातीय विषमता व अन्यायकारक प्रथांविरुद्ध निर्णायक लढा उभारण्यात आला.

    या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दी वर्षाकडे वाटचाल सुरू असताना, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना पुनः अधोरेखित करण्यासाठी पक्षाच्या वतीने अभिवादन व राज्यव्यापी परिषद उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कारक्रमाला माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉ एम ए. बेबी, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ अशोक ढवळे, लोकशाहीर संभाजी भगत, आंबेडकरी साहित्यिक प्रज्ञा पवार, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी आदी व अनेक महत्त्वपूर्ण पक्ष नेते उपस्थित राहणार आहेत.

    या कार्यक्रमाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कमिटी सदस्य कॉ कवडू चांदेकर, कॉ बादल कोडापे, रमेश ताकसांडे यांच्यासह अनेक लढाऊ कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.



    Photo