ठळक बातम्या

    वणीत २८ मार्चला ‘माजी आमदार केसरी कुस्ती’ महादंगल; देशभरातील नामांकित पैलवानांचा थरार, २१ लाखांची बक्षिसे

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : श्री रंगनाथ स्वामी यात्रेनिमित्त वणी शहरात २८ मार्च रोजी भव्य ‘माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल’ आयोजित करण्यात आली असून देशभरातील नामांकित पुरुष व महिला पैलवानांच्या दमदार कुस्त्यांनी जत्रा मैदान दणाणून जाणार आहे. तब्बल २१ लाख रुपयांच्या बक्षिसांसह रंगणाऱ्या या कुस्ती स्पर्धेमुळे क्रीडाप्रेमी व कुस्ती शौकिनांमध्ये मोठे आकर्षण निर्माण झाले आहे.

    ही भव्य महादंगल माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली आहे. पांडुरंग लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडणार असून मनसे नेते राजू उंबरकर यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


    सदर कुस्ती स्पर्धा स्व. श्रीमती सुनंदा मधुकरराव उंबरकर स्मृती प्रित्यर्थ स्टेडियम, जत्रा मैदान, वणी येथे होणार आहे. सकाळपासून कुस्ती फेऱ्यांना सुरुवात होणार असून रात्रीपर्यंत दंगल रंगणार आहे.

    स्पर्धेतील पुरुष गटात प्रथम पुरस्कार १ लाख रुपये, तसेच माजी आमदार केसरी बहुमान आणि स्व. ललित लांजेवार स्मृती प्रित्यर्थ चांदीची गदा प्रदान करण्यात येणार आहे. द्वितीय ७१ हजार, तृतीय ५१ हजार, चतुर्थ ४१ हजार व पाचवा ३१ हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

    तर महिला गटात प्रथम पुरस्कार २१ हजार रुपये व स्व. संभाजी पोटदुखे स्मृती प्रित्यर्थ चांदीची गदा, द्वितीय ११ हजार, तृतीय ७ हजार, चतुर्थ ५ हजार, पाचवा ४ हजार, सहावा ३ हजार व सातवा २ हजार रुपये अशी पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.


    या महादंगलमध्ये राज्यासह देशभरातील कुस्तीपटू सहभागी होणार असून शंभर रुपयांपासून हजारो रुपयांच्या कुस्त्याही रंगणार आहेत. पारंपरिक कुस्तीचा थरार अनुभवण्याची ही दुर्मिळ संधी वणीकरांना मिळणार असल्याने या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    ही कुस्ती महादंगल वणीकर क्रीडाप्रेमी नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




    Photo