विदर्भवार्ता । प्रतिनिधी
वणी : शहरालगत असलेल्या गणेशपुर परिसरात पुन्हा एकदा घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा कुलूपबंद घर फोडून तब्बल २ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगलमुर्ती पार्क, प्लॉट क्र. ४२ येथे राहणारे रामरतन सिताराम हरडे (वय ५९) हे वेकोलीमध्ये नोकरीला आहेत. २१ एप्रिल रोजी दुपारी ते घराला कुलूप लावून ड्युटीवर गेले होते. याच दरम्यान २१ एप्रिल दुपारी ४ ते २२ एप्रिल दुपारी ३ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील दोन सोन्याच्या बांगड्या (४० ग्रॅम, किंमत १,२०,००० रु.), एक सोन्याचा गोफ (२० ग्रॅम, ६०,००० रु.), दोन अंगठ्या (१० ग्रॅम, ३०,००० रु.) तसेच कानातील लटकन (६ ग्रॅम, २०,००० रु.) असा एकूण ७६ ग्रॅम वजनाचा ऐवज चोरून नेला. या दागिन्यांची एकूण किंमत २,३०,००० रुपये आहे.
या प्रकरणी रामरतन हरडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (३), ३३१ (४) व ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साजिद सैय्यद करीत आहेत.
दरम्यान, शहरात वाढत असलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, पोलिसांनी गस्त वाढवून अशा घटनांवर लगाम लावावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


