ठळक बातम्या

    शेतात गळफास घेऊन इसमाची आत्महत्या; वणी तालुक्यात खळबळ, कवडू खोके यांचा संशयास्पद मृत्यू

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : वणी तालुक्यातील लाठी (बेसा) येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, शेतात झाडाला गळफास घेऊन एका इसमाने आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कवडू पांडुरंग खोके (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, दि. १५ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास कवडू खोके हे आपल्या शेतात गेले होते. पहाटे अंदाजे ४ ते ५ वाजताच्या दरम्यान त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही वेळानंतर ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता.

    घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व पुढील तपासासाठी ग्रामीण रुग्णालय, वणी येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.

    दरम्यान, कवडू खोके यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आर्थिक, कौटुंबिक किंवा अन्य कोणत्याही कारणांचा तपास पोलीस करीत आहेत. या अचानक घटनेमुळे लाठी (बेसा) परिसरात शोककळा पसरली असून, गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

    या प्रकरणाचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

    Photo