विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : येथील नगर परिषदेच्या सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला नगर परिषदेचे उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार, मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे, सर्व समित्यांचे सभापती, विभाग प्रमुख तसेच कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यानंतर उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार, मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे, नगरसेवक अजय धोबे, नगरसेवक रवी बेलुरकर, तेजस्विनी गव्हाणे तसेच प्रशासन अधिकारी गजानन कासावार यांनी आपल्या मनोगतातून डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी भारतीय संविधान निर्मितीत दिलेल्या मोलाच्या योगदानाचा गौरव करत, त्यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपल्या जीवनात प्रगतीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम हापसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांनी मानले.




