ठळक बातम्या

    वणी हादरले! संतोषी मातेच्या दर्शनाला गेलेली १३ वर्षांची मुलगी बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

     वणी हादरले! संतोषी मातेच्या दर्शनाला गेलेली १३ वर्षांची मुलगी बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : शहरातील कायदा व सुव्यवस्थेला हादरा देणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. संतोषी मातेचे दर्शन घेण्यासाठी घरातून निघालेली अवघी १३ वर्षांची मुलगी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा आरोप करत वडिलांनी थेट वणी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वडील ३ एप्रिल रोजी सकाळी आपल्या कामावर गेले होते. दुपारी २ वाजता त्यांच्या मुलीने संतोषी माता मंदिरात जाण्याचे सांगून घर सोडले. मात्र सायंकाळी ४ वाजेपर्यंत ती घरी न परतल्याने आईने वडिलांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर वडिलांनी मुलीच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कॉल लागत असूनही प्रतिसाद मिळत नव्हता.

    रात्री उशिरापर्यंत नातेवाईक, मैत्रिणी व परिसरात शोध घेतला, मात्र मुलीचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर संतप्त व चिंताग्रस्त वडिलांनी वणी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने अज्ञात आरोपीविरुद्ध कलम १३७(२) BNS अंतर्गत गुन्हा नोंदवून शोधमोहीम सुरू केली आहे.


    या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.


    सोशल मिडियाचा वाढता धोका!

    अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांमुळे सोशल मिडियाचा वापर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कमी वयात व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक यांसारख्या माध्यमांवर अनोळखी व्यक्तींशी संपर्क हा गंभीर धोका ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


    पालकांनी सावध राहण्याची गरज!

    या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, त्यांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवणे आणि अनोळखी व्यक्तींशी संवाद टाळण्याबाबत जागरूक करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. प्रशासनानेही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

    Photo