मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या पाठपुराव्याला यश
चार वर्षांनंतर सुरू झालेल्या सेवेमुळे नागरिकांत आनंद
विदर्भवार्ता । प्रतिनिधी
वणी : कोरोना काळापासून गेल्या तब्बल चार वर्षांपासून बंद असलेली वणी ते छत्रपती संभाजीनगर एस.टी. बस सेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही बस वणी आगारातून दररोज सकाळी ७ वाजता रवाना होत असून रात्री ८ वाजता छत्रपती संभाजीनगर बस स्थानकावर पोहोचते. सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांसह नोकरी, व्यवसाय आणि इतर कारणांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
दरम्यान, या समस्येची गंभीर दखल घेत मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजू धावंजेवार यांच्या नेतृत्वाखाली फेब्रुवारी महिन्यात वणी आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले होते. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत अखेर ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाबद्दल मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आभार मानण्यात आले आहेत. बस सेवा पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार असून ही सेवा नियमित सुरू ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


