ठळक बातम्या

    “प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने खासदार धानोरकर मैदानात; संघर्षाला राजकीय बळ”

     उकणी प्रकल्पग्रस्तांचा रोजगारासाठी एल्गार; ३ मे अंतिम मुदत


    विदर्भवार्ता । प्रतिनिधी 

    वणी : उकणी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने स्थानिक युवक-युवतींना रोजगार मिळावा या मागणीसाठी ३ मेपासून पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाला खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ठाम पाठिंबा दर्शविला आहे. रविवारी काँग्रेस नेते संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वरोरा येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

    समितीच्या निवेदनात वणी तालुक्यातील मौजे उकणी येथील सुशिक्षित, कुशल-अकुशल तसेच बेरोजगार युवक-युवती आणि हेव्ही वाहन परवाना धारक चालकांना स्थानिक पातळीवर रोजगार देण्याची मागणी अधोरेखित करण्यात आली. उकणी परिसरातील सुमारे २०० हून अधिक कामगारांना एम/एस नारायणी अँड सन्स कंपनीमध्ये प्राधान्याने नोकरीत सामावून घेण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे.

    मात्र, कंपनी व्यवस्थापनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने स्थानिक युवकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. प्रकल्पग्रस्त कुटुंबांना रोजगार देणे ही कंपनीची सामाजिक जबाबदारी असतानाही दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

     ३ मेपर्यंत अल्टिमेटम; अन्यथा तीव्र आंदोलन

    उकणी कोळसा खाण व पुनर्वसन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने कंपनीला ३ मेपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. निर्धारित कालावधीत सकारात्मक तोडगा न निघाल्यास तीव्र स्वरूपाचे चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी समितीने निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

    “प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठाम” — खा. धानोरकर

    या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत निवेदन स्वीकारले. संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत, प्रशासन व कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवत प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य मागण्यांसाठी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असे त्यांनी सांगितले.

    यावेळी अध्यक्ष स्वप्नील गोवारदीपे, उपाध्यक्ष अजय खाडे, सचिव विजय कार्लेकर, कार्याध्यक्ष विनायक येसेकर, सहसचिव प्रभाकर खोब्रागडे, कोषाध्यक्ष मनोज खाडे यांच्यासह कान्हू लोनगाडगे, विशाल चिंचोलकर, नरेंद्र खाडे, प्रथम अंड्रस्कर, रोशन गोबाडे, शुभम चिंचोलकर, सुमेध अंड्रस्कर, अमित पारशिवे, विजय येमूर्ले, सूरज पारशिवे, अरुण डाहुले, किसन पारशिवे, यश शिवरकर, सचिन येमूर्ले, साहिल जोगी, रविंद्र जुनगरी, विशाल निब्रड, साईनाथ ठमके, संतोष दुधूलकर, रामकिसन पारशिवे, सुभाष ढवळे, प्रशांत पाटील, अक्षय ढपकस, सूरज काकडे, संतोष धोंडे, रंजित पारशिवे, मयूर सातपुते आदी उपस्थित होते.



    Photo