ठळक बातम्या

    पिकविमा भरपाईसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश; ७ दिवसांत बैठक घेण्याची मागणी

     १३०७९ शेतकऱ्यांचे १३३७१ हेक्टर क्षेत्र विमाधारक; नुकसान होऊनही भरपाई रखडली


    विदर्भवार्ता । प्रतिनिधी 

    वणी : तालुक्यातील पिकविमा धारक शेतकऱ्यांना हंगाम २०२५-२६ मधील नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार तथा तालुका पिक विमा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    शासनाच्या पंतप्रधान पिक विमा संरक्षण योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामात सोयाबीन, कापूस, तूर व ज्वारी या पिकांसाठी तालुक्यातील १३,०७९ शेतकऱ्यांनी सुमारे १३,३७१ हेक्टर क्षेत्रावर विमा उतरविला होता. यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून रक्कम भरून अग्रीकल्चर इन्सुरन्स कंपनी ऑफ इंडिया या शासन नियुक्त कंपनीकडे ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली होती.

    मात्र ऑगस्ट-सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाकडून नैसर्गिक आपत्ती अंतर्गत सानुग्रह अनुदान वितरित करण्यात आले असले तरी पिकविमा भरपाई जानेवारी २०२६ पर्यंत मिळणे अपेक्षित होते. परंतु तीन महिने उलटूनही संबंधित विमा कंपनीकडून भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

    याबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपनीवर फसवणुकीचा आरोप करत ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केले आहे. तसेच तहसीलदारांनी समितीचे अध्यक्ष म्हणून पुढील दिवसांत बैठक आयोजित करून विमा कंपनी, कृषी विभाग आणि शेतकरी यांना एकत्र बोलावून न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.

    शेतकऱ्यांच्या या मागणीमुळे प्रशासनाची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



    Photo