ठळक बातम्या

    “डिझेल द्या… नाहीतर मनसेचा राडा ठरलेलाच!” — शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक, प्रशासनाला २ दिवसांचा अल्टिमेटम


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

     वणी : शेती हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना डिझेलसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. “सत्ताधाऱ्यांनी मुद्दाम कृत्रिम डिझेल टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. हा प्रकार तात्काळ थांबवावा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन अटळ आहे,” असा थेट इशारा मनसेचे वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी प्रशासनाला दिला आहे.

    मनसेतर्फे उपविभागीय अधिकारी (एस.डी.ओ.) यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, सध्या शेती मशागतीचा अत्यंत महत्त्वाचा काळ सुरू असून शेतकरी ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीची कामे करत आहेत. मात्र बाजारात डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्यामुळे बळीराजाचे काम अक्षरशः ठप्प होण्याची वेळ आली आहे.

    “शेतकऱ्यांच्या घामावर राजकारण करणाऱ्यांना मनसे कधीच माफ करणार नाही. डिझेलचा पुरवठा तात्काळ सुरळीत करा, अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल,” असा संतप्त इशारा गोहोकार यांनी दिला.

    मनसेने प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, येत्या दोन दिवसांत सर्व पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याविना डिझेल उपलब्ध झाले पाहिजे. अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. “आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला प्रशासन आणि पेट्रोल पंप चालकच जबाबदार असतील,” असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

    या निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, तहसीलदार वणी आणि वणी पोलीस स्टेशनला देण्यात आल्या असून मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

    निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश पेचे यांच्यासह राकेश वैद्य, विनोद कुचनकर, धीरज पिदुरकर, वैभव पुराणकर, प्रतीक बुरडकर, मंगेश येटे, आशिष ठावरी, भोला चिकनकर, प्रवीण मांडवकर, प्रदीप बदखल, चेतन काळे, गोवर्धन पिदुरकर, मनोज उरकुडे, देवा साखरकर, सुरज काकडे, धीरज बगवा, कैलास धांडे, सुरज लोंढे, यशवंत ढोके, बबलू चोपणे, संदीप अवगान, अजय तुराणकर यांच्यासह मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक आणि शेतकरी उपस्थित होते.




    Photo