विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
यवतमाळ : भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित “पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६” अंतर्गत यवतमाळ येथे दोन दिवसीय जिल्हा प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. १६ आणि १७ मे रोजी पंडित दीनदयाल प्रबोधनी येथे आयोजित या शिबिरात पक्ष संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांना वैचारिक दिशा देणे तसेच प्रभावी कार्यपद्धती विकसित करण्यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षण शिबिरात आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते मदनभाऊ येरावार, जिल्हा प्रभारी आमदार सुमित वानखेडे, आमदार राजू तोडसाम, ॲड. प्रफूल चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष यवतमाळ तसेच नगराध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी उईके यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिरामध्ये पक्षाची विचारधारा, संघटनात्मक कार्यपद्धती, जनसंपर्क वाढविण्याचे तंत्र, बूथ सक्षमीकरण आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची भूमिका यासंदर्भात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना पक्षाच्या धोरणांप्रती निष्ठा ठेवून जनतेपर्यंत विकासकामे पोहोचविण्याचे आवाहन केले.
या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मंडळ अध्यक्ष, सरचिटणीस तसेच विविध आघाडी व मोर्चांच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शिबिरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.







