ठळक बातम्या

    वागदरा-नांदेपेरात अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा एल्गार

     तीन दिवसांत कारवाई न झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी :मौजा वागदरा व नांदेपेरा येथे सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात महिलांनी आक्रमक भूमिका घेत पोलिस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. वागदरा गावातील महिलांनी ९ मे २०२६ रोजी वणी पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने महिलांनी शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय चोरडिया यांची भेट घेत आपली व्यथा मांडली.

    या प्रकरणाची तात्काळ दखल घेत विजय चोरडिया यांनी महिलांसह वणी पोलीस स्टेशन गाठत अवैध दारूविक्री त्वरित बंद करण्याची मागणी ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्याकडे केली. महिलांच्या म्हणण्यानुसार, वागदरा गावात तीन ते चार जण खुलेआम अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत असून त्यामुळे युवकांसह लहान मुलांमध्येही व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून काहींना जीव गमवावा लागल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

    महिलांनी वागदरा परिसरात जुगार अड्डे आणि गांजा विक्री सुरू असल्याचाही आरोप केला. तसेच नांदेपेरा येथील महिलांनीदेखील गावात सुरू असलेली अवैध दारूविक्री तात्काळ बंद करण्याची मागणी केली.

    अवैध दारू विक्रेते, जुगार अड्डे चालविणारे आणि गांजा विक्रेत्यांवर तीन दिवसांत कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. त्यामुळे आता पोलिस प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

    निवेदन देतेवेळी शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया,सुधाकर गोरे,राहुल पारखी,  शुभम गोरे (समन्वयक,  लोकसभा चंद्रपूर-वणी-आर्णी), विधानसभा संघटक प्रमुख वणी- किशोर नांदेकर, नरेंद्र बदखल, मिनानाथ काकडे    संगीता मुरस्कर, मनिषा कोंगरे, भाग्यश्री वैद्य, वसुधाताई ढगे यांच्यासह अनेक महिला व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.






    Photo