विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : वणी शहरात अमली पदार्थांच्या विक्री व तस्करीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत वणी पोलिसांनी मोठी कारवाई करत 19.27 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थासह एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत एक मोबाईल फोनसह एकूण 1 लाख 49 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर राबविण्यात येत असलेल्या अमली पदार्थविरोधी अभियानादरम्यान वणी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 19 जून रोजी रात्री 9.45 वाजताच्या सुमारास गणेशपूर रोड परिसरात छापा टाकण्यात आला.
या कारवाईत कौतुक उर्फ गोलू दिलीप मेश्राम (वय 28, रा. तेलीफैल, वणी) याच्या ताब्यातून प्लास्टिक पाऊचमध्ये ठेवलेले 19.27 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या एमडी पावडरची किंमत 1 लाख 34 हजार 890 रुपये असून आरोपीकडील 15 हजार रुपयांचा मोबाईल फोनही पोलिसांनी ताब्यात घेतला.
चौकशीदरम्यान सदर अमली पदार्थ प्रज्ज्वल उर्फ काॅकरोच महेश उपरे (वय 27, रा. तेलीफैल, वणी) याच्याकडून आणल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
याशिवाय यापूर्वी दाखल असलेल्या एमडी पदार्थ विक्री प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यामध्ये प्रज्ज्वल महेश उपरे, अविनाश विजय पाटील आणि रविंद्र धनराज गुप्ता यांचा समावेश आहे.
[वणी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, एमडीसह इतर कोणत्याही अमली पदार्थांच्या विक्री किंवा तस्करीबाबत माहिती असल्यास ती पोलिसांना कळवावी. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल.]
ही कारवाई पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी साजिद सय्यद, पोउपनी सुयोग महापुरे, पोलीस अंमलदार मोनेश्वर खंडरे, नंदकुमार पोपुलवार, गणेश मेश्राम, अरविंद बुच्चे, मिथुन राउत, श्याम राठोड, निलेश आडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
युवा पिढीसाठी संदेश
"एमडी, गांजा, ड्रग्ज यांसारख्या अमली पदार्थांचे आकर्षण क्षणिक असले तरी त्याचे परिणाम आयुष्य उद्ध्वस्त करणारे असतात. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळावे. समाजातील प्रत्येक नागरिकाने अमली पदार्थांविरोधात जागरूक राहून पोलिसांना सहकार्य करणे ही काळाची गरज आहे."


