ठळक बातम्या

    घरगणनेच्या नावाखाली ओबीसी समाजाची दिशाभूल; जातनिहाय जनगणनेबाबत स्पष्टता द्या – प्रवीण खानझोडे

     “जातनिहाय जनगणनेचा निर्णय जाहीर झाला असताना राजपत्रात ओबीसींचा स्पष्ट उल्लेख नसल्याने समाजात संभ्रम निर्माण झाला आहे,” अशी भूमिका लढा संघटनेने मांडली.


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : सन २०२७ च्या जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय (OBC) समाजाची जातनिहाय गणना स्पष्टपणे समाविष्ट करण्यात यावी आणि या संदर्भात निर्माण झालेला संभ्रम दूर करावा, अशी मागणी लढा संघटनेचे प्रवीण खानझोडे यांनी केली आहे. यासंदर्भात आज उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले.

    प्रवीण खानझोडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, भारताचे महा निबंधक (Registrar General of India) कार्यालयाने दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी सन २०२७ च्या जनगणनेबाबत राजपत्र प्रसिद्ध केले आहे. या राजपत्रानुसार घरांची यादीकरण व घरगणनेसाठी अनुसूची तयार करण्यात आली असून त्यामध्ये नागरिकांकडून माहिती संकलित करण्यासाठी एकूण ३३ प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

    सदर प्रश्नावलीमध्ये सामाजिक गट किंवा जातीच्या प्रवर्गाबाबत माहिती घेताना अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, इतर मागासवर्गीय (OBC) समाजाचा स्वतंत्र व स्पष्ट उल्लेख नसल्याने ओबीसी समाजामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक गटाच्या वर्गवारीत OBC, NT, VJ, SBC, Open, अल्पसंख्याक आदी विविध घटकांचा एकत्रित समावेश करण्यात येत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.

    निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही याबाबत प्रसारमाध्यमांद्वारे माहिती दिली होती. मात्र, त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या राजपत्रात ओबीसी समाजाचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे शासनाच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

    यामुळे केंद्र शासनाने सुधारित अथवा नवीन राजपत्र प्रसिद्ध करून इतर मागासवर्गीय (OBC) समाजाच्या जातनिहाय गणनेबाबत स्पष्ट सूचना जारी कराव्यात तसेच समाजामध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

    निवेदन सादर करताना प्रवीण खानझोडे, सुरेश मांडवकर, राजू तूरनाकर, सुरेंद्र घागी, गुलाब झाडे, वासुदेव पारखी, रवींद्र उपरे, रेव्ह. रोशन मलया गारपेल्लीवर, नियाज अली, जफर खान, विजय बोबडे, आकाश दुबे, मोहन महाकुळकर (परमडोह), गौरव वाभिटकर (परमडोह) यांच्यासह अनेक ओबीसी बांधव उपस्थित होते.



    Photo