विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका कार्यक्रमादरम्यान आदिवासी समाजाचा उल्लेख 'वनवासी' असा केल्याच्या निषेधार्थ आदिवासी कृती समिती वणी, झरी आणि मारेगावच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी समाज हा देशाचा मूळ निवासी समाज असून त्याची स्वतंत्र संस्कृती, परंपरा, भाषा आणि ऐतिहासिक ओळख आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासह विविध सामाजिक चळवळींमध्ये आदिवासी वीरांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असून त्यांच्या इतिहासाचा व अस्मितेचा सन्मान राखला जाणे आवश्यक आहे.
समितीच्या मते, "वनवासी" हा शब्दप्रयोग आदिवासी समाजाच्या स्वतंत्र ओळखीशी सुसंगत नसून समाजाच्या भावना दुखावणारा आहे. संविधान आणि प्रशासकीय व्यवस्थेत आदिवासी समाजाला स्वतंत्र मान्यता देण्यात आलेली असताना अशा प्रकारच्या संबोधनामुळे समाजामध्ये नाराजी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या वक्तव्याबाबत सार्वजनिक स्पष्टीकरण द्यावे व आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच आदिवासी समाजाच्या ओळखीचा व संवैधानिक स्थानाचा सन्मान राखला जावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी ॲड. अरविंद सिडाम, संतोष चांदेकर, डॉ. शैलेश आत्राम, बाबाराव गेडाम, गणेश माघाडे, अशोक नागभिडकर, प्रशांत जुमनाके, अमोल कुमरे, सुनील नैताम, लहानू सालुरकर यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.



