विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
माळशिरस (सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे खाजगी पिकअप वाहन विहिरीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या हृदयद्रावक घटनेत एका तरुणाच्या धाडसाने मानवतेचे जिवंत उदाहरण समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप वाहन अचानक विहिरीत कोसळले. त्याचवेळी वाहनाच्या मागून येत असलेल्या इरफानने हा प्रकार पाहिला. क्षणाचाही विलंब न करता त्याने विहिरीत पडलेल्या एका लहानग्या मुलाला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने आणखी पाच जणांचे प्राण वाचविण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली.
या दुर्घटनेने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला असला तरी इरफानच्या धाडसाने आणि गावकऱ्यांच्या एकजुटीने संकटाच्या काळात माणुसकीच सर्वात मोठा धर्म असल्याचा संदेश दिला आहे.
विचार सामान्यांचे
तांदुळवाडीतील ही घटना केवळ अपघाताची बातमी नाही, तर समाजासाठी एक मोठा संदेश आहे. संकटाच्या वेळी कोणाचा धर्म, जात किंवा पंथ पाहिला जात नाही; तेव्हा धावून येतो तो माणूस आणि कामी येते ती माणुसकी.
महाराष्ट्राची ओळख ही नेहमीच सामाजिक सलोखा, बंधुता आणि परस्पर सहकार्याची राहिली आहे. काही राजकीय स्वार्थासाठी समाजात द्वेषाची बीजे पेरण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र अशा घटनांमधून पुन्हा एकदा सिद्ध होते की, संकटसमयी द्वेष पसरवणारे नव्हे तर आपल्या आसपासची माणसेच मदतीला धावून येतात.
म्हणून समाजाने कोणत्याही भडकावू प्रचाराला बळी न पडता माणुसकी, बंधुता आणि एकतेची परंपरा जपणे हीच काळाची गरज आहे.
"धर्मापेक्षा माणुसकी मोठी, आणि संकटाच्या काळात माणूसच माणसाच्या कामी येतो."
