ठळक बातम्या

    सततच्या पाठपुराव्याला यश; वणीतील प्रमुख चौकांमध्ये गतिरोधक बसविण्यास सुरुवात

     मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या मागणीची नगर परिषदेकडून दखल

    भरधाव वाहनांना लगाम; अपघात रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : वणी शहरातील वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचा धोका लक्षात घेऊन मुख्य मार्गांवर गतिरोधक (स्पीडब्रेकर) बसविण्याची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. मानवी हक्क सुरक्षा परिषद (ट्रस्ट) यांच्या वतीने राज्याध्यक्ष राजू धावंजेवार यांच्या नेतृत्वात नगर परिषद वणीकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शहरातील प्रमुख चौकांमध्ये गतिरोधक बसविण्यात आले आहेत.

    यासंदर्भात दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी मा. मुख्याधिकारी, नगर परिषद वणी यांना निवेदन सादर करण्यात आले होते. शहरातील वाढती लोकसंख्या आणि दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता कायम असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते.

    लोकमान्य टिळक महाविद्यालयासमोरील गतिरोधकांप्रमाणेच भगतसिंग चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक, टिळक चौक, विराणी टॉकीज रोड तसेच शहरातील इतर वर्दळीच्या मार्गांवर गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत नगर परिषद प्रशासनाने शहरातील प्रमुख चौकांमध्ये गतिरोधक उभारण्याचे काम हाती घेतले असून काही ठिकाणी ते पूर्णही करण्यात आले आहे.

    या निर्णयामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण येण्यास मदत होणार असून नागरिक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेत वाढ होणार आहे. नगर परिषद प्रशासनाने केलेल्या या कार्यवाहीबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजू धावंजेवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचेही कौतुक होत असून त्यांचे नागरिकांकडून आभार मानले जात आहेत.




    Photo