ठळक बातम्या

    वणीत धारदार सत्तूरसह इसम पोलिसांच्या ताब्यात; रंगारीपुरा परिसरात कारवाई


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

     वणी : दि. १५ जून : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वणी पोलिसांकडून सुरू असलेल्या गस्तीदरम्यान रंगारीपुरा परिसरात एका संशयित व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडून लोखंडी बनावटीचा धारदार सत्तूर जप्त करण्यात आला.

    मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. १५ जून) रोजी वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या निर्देशानुसार पोलीस पथक शहरातील विविध भागांत गस्त घालत होते. यावेळी रंगारीपुरा परिसरात एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

    सदर व्यक्तीची चौकशी करून झडती घेतली असता त्याच्याकडून कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना सार्वजनिक ठिकाणी बाळगण्यात आलेला लोखंडी धारदार सत्तूर आढळून आला. हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिसांनी तत्काळ शस्त्र जप्त करून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले.

    या प्रकरणातील आरोपीची ओळख महेश रमेश मोहबिया (वय ३५, रा. रंगारीपुरा, वणी) अशी पटली असून त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

    ही कारवाई पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक साजिद सैय्यद तसेच गजानन सावसाकडे, विशाल राठोड, आकाश अवचारे, मोनेश्वर खंडरे, गणेश मेश्राम आणि नंदकुमार पुप्पलवार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

    संदेश

    अवैध शस्त्रे बाळगणे हा कायद्याने गुन्हा असून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या अशा कृत्यांविरोधात पोलिसांची कारवाई सातत्याने सुरू आहे. नागरिकांनी संशयास्पद हालचाली किंवा अवैध शस्त्रास्त्रांची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन सुरक्षित समाजनिर्मितीत सहकार्य करावे.




    Photo