विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने जनतेशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी आणि नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंगळवार, दिनांक १६ जून २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजता होणार आहे. हे कार्यालय बाकडे पेट्रोल पंपासमोर, यवतमाळ रोड, वणी येथे सुरू करण्यात येत असून या उद्घाटन सोहळ्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चव्हाण, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह वणी विधानसभा क्षेत्रातील पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
यावेळी विधानसभा क्षेत्रातील सर्व वरिष्ठ नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध आघाड्या, सेल व प्रकोष्ठांचे प्रमुख, नगरसेवक, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवीन जनसंपर्क कार्यालयामुळे नागरिकांच्या समस्या, तक्रारी आणि विविध विकासकामांशी संबंधित प्रश्नांना थेट व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पक्ष संघटन अधिक बळकट करण्यास आणि जनतेशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवण्यास या कार्यालयाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे.
“जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सक्षम व्यासपीठ देण्यासाठी भाजपचे नवीन जनसंपर्क कार्यालय सज्ज”


