विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : वणी तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व शेतकरी यांना सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाच्या ग्रामीण मार्गांचे सर्वेक्षण करून नवीन एसटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वणी आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वणी तालुका खनिजसंपन्न असून अनेक ग्रामीण भागांमध्ये जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते उपलब्ध आहेत. शासनाच्या विविध प्रवासी कल्याणकारी योजना अस्तित्वात असतानाही अनेक गावांमध्ये एसटी बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून अनेक होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधींपासून वंचित राहण्याची वेळ येत आहे.
तसेच बाजारपेठ, शासकीय कार्यालये, आरोग्य सेवा आणि शैक्षणिक सुविधा गाठण्यासाठी ग्रामीण नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
यासाठी खालील महत्त्वाच्या मार्गांचे सर्वेक्षण करून बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे –
१) वणी – तरोडा – बेलोरा मार्गे घुग्घुस (जि. चंद्रपूर)
२) वणी – शिंदोला – कळमणा मार्गे गडचांदूर (जि. चंद्रपूर)
३) वणी – शिरपूर – वेळाबाई मार्गे मोहदा – कृष्णापूर (ता. वणी, जि. यवतमाळ)
या मार्गांवर सुमारे ४० गावांचा समावेश असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, महिला, शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि लघु व्यावसायिकांना याचा लाभ होणार असल्याचे पिदुरकर यांनी म्हटले आहे. आगामी शैक्षणिक सत्र लक्षात घेऊन जुलै २०२६ पासून बससेवा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी एसटी प्रशासनाकडे केली आहे.
ग्रामीण भागाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी ही बससेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण, नागरिकांना रोजगार व शासकीय सेवांपर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक ही मूलभूत गरज बनली आहे. त्यामुळे या मार्गांवर बससेवा सुरू झाल्यास हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.


