विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : चंद्रपूर आगारांतर्गत पूर्वी सुरू असलेली चंद्रपूर–घुग्घुस–नकोडा–साखरा–सिंदोला–मोहदा–कृष्णांनपूर –मुकुटबंन ही बससेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी श्रीमती प्रांजली थोटे, विभागीय वाहतूक अधीक्षक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, चंद्रपूर यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ही बससेवा चंद्रपूर व यवतमाळ या दोन जिल्ह्यांतील विद्यार्थी, महिला, शेतकरी, कामगार तसेच लघु व्यावसायिकांसाठी अत्यंत महत्त्वाची होती. मात्र काही वर्षांपूर्वी ही सेवा बंद करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः मुकुटबन परिसरातील कोळसा खाणी व औद्योगिक प्रकल्पांमध्ये काम करणारे कामगार, तसेच शिक्षणासाठी आणि दैनंदिन कामांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे ही बससेवा पूर्ववत सुरू झाल्यास हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार असून परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी संबंधित मार्गावरील नागरिकांच्या सोयीचा विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.


