विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : नगर वाचनालय, मित्र मंडळ, विदर्भ साहित्य संघ वणी आणि प्रेस वेलफेअर असोसिएशन, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच नगर वाचनालयात उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर वाचनालयाचे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकूरवार होते. प्रमुख अतिथी म्हणून वणीचे पोलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर, मित्र मंडळाचे अध्यक्ष उत्तम गेडाम, विदर्भ साहित्य संघ वणीचे अध्यक्ष प्रा. दिलीप अलोणे तसेच प्रेस वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल बिलोरिया उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्नेहलता चुंबळे यांच्या स्वागत गीताने झाली. यावेळी प्रा. दिलीप अलोणे आणि उत्तम गेडाम यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आई-वडील, शाळा आणि गावाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले. बक्षीस वितरक म्हणून बोलताना पोलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांनी आपल्या जीवनातील अनुभव कथन करत विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन समाज व देशाप्रती असलेली जबाबदारी ओळखावी, असे सांगितले.
यावेळी विद्यार्थिनी आरोही ढेंगळे, पालक प्रतिनिधी चंदू परेकर तसेच वणीची पहिली महिला वैमानिक विधी सुरेश बाजोरिया यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी जीवनात यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम आणि सातत्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
या प्रसंगी वणी शहरातील राज्य अभ्यासक्रमाच्या मराठी व इंग्रजी माध्यमातील शाळांमधून सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच आपल्या जिद्द, मेहनत आणि धाडसाच्या बळावर वैमानिक बनून एअर इंडियामध्ये रुजू झालेल्या वणीच्या कन्या विधी सुरेश बाजोरिया यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. याचबरोबर वणी येथे नुकतेच रुजू झालेले पोलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांचाही सत्कार करण्यात आला.
स्व. नानाजी व लक्ष्मीबाई भागवत, स्व. बाबुरावजी देशपांडे तसेच स्व. शालिनीताई व रामदास भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांना विशेष बक्षिसांचे वितरणही करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. स्वानंद पुंड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार आणि कल्पना राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी आयोजक संस्थांचे पदाधिकारी, सभासद, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





